Ad will apear here
Next
गरिबीच्या काळातली समृद्ध दिवाळी!


१९७०च्या दशकात बेळगावमध्ये गेलेल्या लहानपणात अनुभवलेल्या दिवाळीच्या आठवणी लिहिल्या आहेत विजयालक्ष्मी देवगोजी यांनी... आठवणीतली दिवाळी  या सदरात...
...........
असं म्हणतात, की प्रत्येक मानवाच्या मनात एक मूल दडून बसलेलं असतं आणि म्हणूनच बालपणीच्या सुखद आठवणींचा काळ कुणीही कधीही विसरू शकत नाही. मनातलं मूल त्या आठवणीतच रमतं, शरीर कितीही म्हातारं झालं तरी. मग त्याला दिवाळीच्या आठवणी तरी का अपवाद असाव्यात? माझ्या मनातल्या मुलाला त्याच्या वेळच्या दिवाळीच्या स्मृती आज जागवायच्यात. 

दिवाळी म्हटलं की आठवतो तो पहाटेचा धूसर प्रकाश, कडाडून वाजणारी थंडी, आई-दादांच्या आम्हा मुलांच्या नावाने मारल्या जाणाऱ्या हाका. बळेच उठून, काकडणारे हात छातीवर दाबून कडकड वाजणारे दात मुद्दाम जास्तच कडकडवत जाऊन बसायचे ते आईने डेऱ्याखाली जाळ घातलेल्या चुलीसमोर, हात-पाय-पाठ चांगली शेकली, की मग आईने पेटवून दिलेल्या पणत्या अंगणात, परसात, तुळशीवर, देवासमोर आधी ठेवायच्या. तोवर आई शेणाचे छोटे पेंदके करायची. त्यावर झेंडूची फुलं खोवून द्यायचे आणि समोरच्या अंगणातल्या रांगोळीच्या मध्यावर एक व चौकटीच्या बाजूला दोन ठेवायचे काम माझे. शेजारच्या घरातल्या रेडिओवर लागलेले नरकचतुर्दशीच्या कीर्तनाचे बोल ऐकत ऐकत त्या तालावर कामे चालायची. दादांच्या, भावांच्या व माझ्या अंगाला आई तेल लावून द्यायची. तिचा तो खरखरीत हात अजूनही अंगावर स्पर्श उमटवून जात असतो. मग आदल्या रात्री आईने चुन्याच्या नक्षीने सजवून लंगोट्याचा वेल घालून मढवलेल्या डेऱ्यातल्या कढत-कढत पाण्याने आंघोळ व्हायची, की थंडी बोल-बोल म्हणता पळून जायची. 

दोन वर्षांतून एकदाच मिळणारे नवीन कपडे घालायचे (यातही कधी कधी शाळेचा युनिफॉर्मच नवीन शिवलेला असायचा, तोच दिवाळीदिवशी घालायचा.) परसवात पुरुष मंडळींना उभे करून आरती करायची. त्यांच्या पायाच्या बोटाखाली नरकासुराचं प्रतीक म्हणून कारीटं द्यायची. ती अंगठ्याने चिरडून मग पुरुषमंडळी घरात यायची. फक्त पानसुपारीचीच ओवाळणी मिळायची. नंतर आत येऊन सर्व जण गोलाकार बसून वर्षातून एकदाच केल्या जाणाऱ्या फराळावर ताव मारायचे. आईच्या हातच्या चकलीची खुसखुशीत चव जगातल्या कुठल्याच चकलीत नाही असंच आजही वाटतं.

लक्ष्मीपूजेदिवशी हातात एक पिशवी घेऊन बाजारात जायचे. प्रत्येक दुकानाच्या पूजेतला चुरमुरे-बत्ताशाचा प्रसाद गोळा करायचा. कुरकुरीत चुरमुऱ्यांबरोबर ओलं खोबरं मस्त लागायचं. हे चुरमुरे आम्हाला पुढे आठ दिवस पुरायचे. चहात टाकून कप कानाला लावून चुरचुर आवाज ऐकायचा, खिशात भरून शाळेला जाता जाता तोंडात टाकायचे. 

लक्ष्मीपूजन म्हटलं, की गवळणमामीची आठवण येणं हे एक समीकरणच आहे. त्यांचं मिठाईचं दुकान होतं आणि त्यांची लक्ष्मीपूजा पौर्णिमेला असायची. दर वर्षी आतुरतेने वाट पाहायचो ते त्या वेळी मिळणाऱ्या मसाला दुधाची. पूजा संपेपर्यंत धीर नसायचा. एरव्ही दूध पाहायलाही न मिळणारे आम्ही त्या दिवशी ग्लासभर दूध प्यायचो, गरमागरम आणि ती चव, ते समाधान वर्षभर पुरायचं आम्हाला. 

पाडव्यादिवशी मग सकाळ उजाडायची ते आई शेणाच्या गवळणी करताना होणाऱ्या आवाजानेच. उखळाभोवती सात-आठ मोठ्या गवळणी बसवायची, अंगणात एक मोठी गवळण, सोप्याच्या कोपऱ्यात एक, उखळाभोवती वाडा करायची, कृष्ण व पेंद्या करून झोपवायची. त्या शेणातूनच एक गवळण दळायची, एक भात कांडताना दिसायची. छोट्या-छोट्या केशरी झेंडूच्या फुलांनी भरपूर सजवायची, त्या ठिकाणी मुसळ, नवीन मोळाचा झाडू ठेवायची. (झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानतात.) आम्ही मुली-मुली मग परडी-परडी हिंडून आघाड्याची फुलं व एक प्रकारच्या बिया गोळा करून आणत असू. प्रत्येक गवळणीच्या डोक्यात फुल खोवायचं, बियांचे डोळे लावायचे, आईने दिलेलं दही चमच्याने प्रत्येक गवळणीत डोक्यावरील बुट्टीत घालायचे.

संध्याकाळी मजा असायची. गल्लीतला धोंडीराममामा आपल्या सर्व १०-१२ म्हशींना सजवायचा आणि त्यांना पळवत न्यायचा गल्लीतून. त्या म्हशी पळताना पाहायला गल्लीत एकच गर्दी उसळायची. समोरच्या रुक्मीण मामीच्या घरासमोर थांबायचा. एका शिकवलेल्या म्हशीला हैक, हैक करून बसवायचा, उठवायचा. लालभडक पटक्याचा शेमला उडवत राहायचा आणि मग नारायणमामाकडून बिदागी मिळाली, की परत म्हशी बेफाम दौडवत निघून जायचा. रात्री सात ते आठपर्यंत आम्ही मुली-मुली आरतीचं ताट सजवून प्रत्येकीच्या घरातील सोप्यातल्या मुख्य गवळणीसमोर आरती करत फिरायचो. म्हणायचो,

‘गौळण, गौळण ईरगे ईरगे,
बलवू सयेला दीरगे दीरगे.
गवळण आमची जातली, जातली,
भांग भरून घेतली, घेतली.’

भाऊबिजेदिवशी चारही भावांना आरती करायची, तेव्हा मात्र पुस्तकं मिळायची भाऊबीज म्हणून. ‘फुलबाग’ व ‘किशोर’ मासिकांचे दिवाळी अंक मिळायचे आणि मग सकाळच्या कोवळ्या उन्हात अंगणात तरट अंथरून त्यावर बसून वाचन केलेला तो आनंद अखंड आयुष्य भरून उरला आहे. आजही आठवणींच्या अत्तरकुपीतला तो अदृश्य वाचनसुगंध मनावर रेंगाळूनच राहिला आहे. आज्जी म्हणायची, ‘चार भावातनं एकच भईन हायगे बाई माजी तुळस’ (तेव्हा फुगून जायला व्हायचे.) आई एखादं गाण्याचं कडवं गुणगुणायची...

‘माझ्या गंदारावरनं रंगीत गाड्या गेल्या,
भावानी बहिणी नेल्या बिजेसाठी’

फटाकडे कधी जास्त मिळालेच नाहीत. लवंगी मिरचीच्या एकेक माळा, सापाच्या गोळ्या आणि चपट्या डबीत मिळणाऱ्या लाल-लाल फटाक्याच्या टिकल्याच मिळायच्या. तेवढ्यातही आम्ही प्रचंड खूश होत होतो.

दिवाळीच्या वेळी आठवते ते भाऊ आकाशकंदील घरी स्वत: बनवायचे ते. खपून खपून बनवायचे, कागद आणायचे, मेदराकडून बारीक काठ्या आणून स्वत:च आकाशकंदील बनवायचे. किल्ले करायचे. त्या मातीच्या गडावर मोहरी पेरायचे. कल्पक भाऊ मग शिवाजी महाराजांची हलती तलवार बनवायचा. मावळ्यांच्या लुटपुटीच्या लढाई दाखवायचा. दोऱ्याने ओढून-ओढून मावळ्यांचे हात हलवायचा. हे पाहायला मुलांची गर्दीच्या गर्दी व्हायची. 

कोपऱ्यावरच्या लक्ष्मीच्या देवळात आई शेजारपाजारच्या मुलांना, आम्हाला घेऊन जायची व तिथे खूपसे दिवे लावून चुरमुऱ्यांचा प्रसाद वाटायची. त्याला ‘कार्तिकलावणे’ म्हणायची. 

आजकाल काळाच्या ओघात दिवाळीत खूप बदल झालेले आहेत. शरीर येणाऱ्या काळाबरोबर चालते आहे; पण मनात दडलेल्या बालपणीच्या दिवाळीची आठवण बदलत नाही. ती जणू गोठून बसलीय मनात. आमची परिस्थिती त्या वेळी गरिबीची होती; पण आम्ही खूप-खूप समाधानाने अत्यंत समृद्ध होतो. आता परिस्थिती समृद्धीची आहे; पण का कुणास ठाऊक दिवाळी खूप गरिबीची आहे, असं नकळत वाटून जातं.

- विजयालक्ष्मी वि. देवगोजी,
सारस्वत वसाहत, लांजा, जि. रत्नागिरी. 
मोबाइल : ८४४६३ ७५२५१
ई-मेल : vijayalaxmivd@gmail.com

(आठवणीतली दिवाळी या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZSDCF
Similar Posts
दिवाळीच्या आठवणी जागवणारी चित्रपटगीते ‘सुनहरे गीत’ या सदरात दर वेळी आपण एखाद्या कलावंताबद्दलची माहिती घेऊन त्याच्या एखाद्या गीताचा आस्वाद घेतो. आजचा लेख मात्र वेगळा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदरलेखक पद्माकर पाठकजी यांनी स्मरणरंजनपर लेख लिहिला आहे. त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणात दिवाळीच्या काळात रेडिओवर ऐकल्या जाणाऱ्या ‘सुनहऱ्या’ चित्रपटगीतांच्या
गावातील दिवाळी! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले आहे कणकवलीतील तुषार हजारे यांनी...
पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण काही कामानिमित्त पोरबंदरला गेलेल्या मनोहर जोगळेकर यांना दिवाळीच्या कालावधीतही तिथेच राहावे लागले होते. त्या वेळच्या आठवणी जागवणारा हा त्यांचा लेख...
दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी सध्या रत्नागिरीत असलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील कराळेवाडीत माहेर असलेल्या रेश्मा मोंडकर (पूर्वाश्रमीच्या संगीता कराळे) यांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language